Pune : वानवडी परिसरात वाळू सप्लायरवर भरदिवसा गोळीबार करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी भागात वाळू सप्लायर तरुणावर गोळीबारकरून पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. राजेश भिकू पडवळ (वय २५, रा. गोरे बुद्रूक, हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत मयूर विजय हांडे (वय २९, रा. हांडेवाडी, हवेली) जखमी झाला होता.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मयूर हे वाळू सप्लायर आहेत. दरम्यान ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास हांडे वाडी रोडवरील श्रीराम चौकात थांबले होते. यावेळी पाई चालत आलेल्या एका तरुणाने जवळून त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने यात एक गोळी मयूर यांच्या गालाला चाटून गेली होती. यात ते किरकोळ जखमी झाले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

यानुसार वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेत होते. यावेळी गोळीबार करणारा आरोपी बिबवेवाडी येथे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली. वानवडी पोलिसांनी केवळ ४८ तासांत यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने गोळीबार का केला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.