पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान वाद, तरूणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड कॉलेजजवळ लॉकडाऊन काळात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना वाद झाले. हे वाद सोडण्यास आलेल्या एकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. गणेश कुंवर (वय ३२ रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ दत्तात्रय कुंवर हे विकासनगर परिसरात राहतात. शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आरडा ओरडा सुरू होता. त्यामुळे त्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यावेळी एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याचे समजले. त्यांनी व त्यांच्या भावाने जाऊन त्या मुलांचे वाद सोडविले.

तसेच, त्यांना त्या ठिकाणाहून घरी जाण्यास सांगितले. आरोपी त्या ठिकाणाहून गेले. पण, काही वेळानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी आले. त्यावेळी फिर्यादी हे दारात बोलत उभे होते. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून कोयत्याने त्यांच्या कानावर, डोक्यावर हातावर वार केले. तर इतर आरोपींनी दगड फेकून मारले. यात ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी पसार झाले. नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांना माहिती दिली. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. अधिक पोलिस उपनिरीक्षक ए. बी. काळे करत आहेत.