पुणे – बेळगाव ‘जन्मशताब्दी एक्सप्रेस’ला नीरा स्थानकावर थांबा देण्याची मागणी

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – पुणे रेल्वेस्थानकावरून नव्याने सुरू होणारी पुणे- बेळगांव जन्मशताब्दी एक्सप्रेसला पुरंदर तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या नीरा रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांंचा थांबा देण्यात यावा अशी प्रवाशांची मागणी असून यासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदचे माजी सदस्य विराज काकडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे –
बेळगांव दरम्यान जन्मशताब्दी एक्स्प्रेस सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या एक्सप्रेसने नीरा रेल्वे स्थानकावरून बेळगांवकडे जाणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र सोमवारी (दि.१३) रेल्वे प्रशासनाच्यावतीने येत्या ९ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या पुणे – बेळगांव दरम्यान जन्मशताब्दी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकावरून
जन्मशताब्दी एक्सप्रेस सुटल्यानंतर सिंदवणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, चिकोडी रोड, गोकाक रोड या स्थानकांवर थांबा घेत पुढे बेळगांवला पोहोचणार आहे. त्यामुळे नीरा स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करून जन्मशताब्दी एक्सप्रेसला नीरा स्थानकांवर थांबा देण्यात यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांनी जि.प.चे माजी सदस्य विराज काकडे यांच्याकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खा.सुप्रिया सुळे यांंच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, नीरा रेल्वेस्थानकावरून पुरंदर तालुक्यातील नीरा, पिंपरेखुर्द, जेऊर, मांडकी, वाल्हे, गुळूंचे, राख तसेच बारामती तालुक्यातील निंबुत , सोमेश्वरनगर, वडगांव निंबाळकर, को-हाळे, मु्र्टी, मोरगांव आदी भागातून मुंबई, पुणे , कोल्हापूर, मिरज, सांगली, बेळगांव, बेंगलोर आदी भागात ये -जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे विराज काकडे यांनी सांगितले.