Pune : सराईत ‘शुभम’ जामिनावर येरवडा जेलमधून बाहेर, चाहत्यांनी स्वागतासाठी कार, दुचाकीवर काढली लोणीकाळभोरपर्यंत रॅली, व्हिडिओ व्हायरल होताच ‘भाई’ गोत्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्याच्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले जात असून, कारागृहातून बाहेर आल्यानंतर फिल्मी स्टाईलने गुन्हेगार ‘शुभम’ची येरवडा कारागृहाचे गेट ते लोणीकाळभोर परिसर अशी जंगी मिरवणूक रात्री काढण्यात आली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पकडले. आता सुटकेनंतर कारागृहाच्या बाहेर नव्या भाईंचं स्वागत होणे आणि नंतर ‘डांगडींग’ करत रॅली काढणे नित्याचे होऊ लागले आहे.

शुभम कैलास कामठे (वय 26, रा. कडमवाक वस्ती) असे मिरवणूक काढलेल्या गुन्हेगार ‘भाई’चे नाव आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तर खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा जामीन झाला. त्यानंतर मात्र या भाईचे त्याच्या चाहत्यांनी नुसते जंगी स्वागतच नाही केले. तर त्याची कार आणि दुचाकीवरून येरवडा कारागृह ते लोणी काळभोर परिसरापर्यंत रॅली देखील काढली. त्याचा व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो भाई सर्वांच्या नजरेत आला. पोलिसांना हा व्हिडीओ मिळताच त्यांनी गुन्हा दाखल केला आणि या शुभम ‘भाई’ला पकडले आहे. याप्रकरणी अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. शुभम कामठे याचे लोणी काळभोर आणि हडपसर परिसरात वर्चस्व असून, तो स्वतःला भाई समजतो.