पुण्यातील वर्दळीच्या चौकातच त्यानं पोलिस असल्याची बतावणी केली, दुचाकी पळवली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – मालधक्का चौकातील सिग्नलला थांबल्यानंतर पोलिस असल्याची बतावणीकरून त्या तरुणाला चौकशीच्या बहाण्याने बाजूला घेऊन दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी ओमकार फडतरी (वय 26, रा. कसबा पेठ) या तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पुणे स्टेशनकडे जात होते. मालधक्का चौकात सिग्नलला लागल्यामुळे ते थांबले. त्यावेळी दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी पोलिस असल्याचे दाखवत त्यांना चौकशीसाठी बाजूला दुचाकी घेण्यास सांगितली. त्यानंतर दुचाकीची कागदपत्र त्यांच्याकडे मागितली. पण, त्यांच्याकडे कागदपत्र नसल्याने समर्थ पोलिस चौकीत चल असे म्हणून त्यांच्या दुचाकीची चावी घेतली. त्यानंतर त्यांची दुचाकी त्यांनी चोरून नेली. तक्रारदार यांना ते दोघेजण पोलिस असल्याचे वाटले. पण, दुचाकी घेऊन गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यावेळी पोलिस नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.