पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या इमारतीत ‘बालस्नेही पोलीस कक्ष’ सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या इमारतीत “बालस्नेही पोलीस कक्ष” सुरू करण्यात आला असून, या कक्षाचे उद्घाटन आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते झाले. आज हा उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संचालक कॅरोलीन अडोर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महिला, बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

करंदीकर म्हणाले, बालकांना विश्वास देण्याचे काम आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम बालस्नेही पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. हा उपक्रम प्रशंसनीय आहे. भारतात बालकांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. बालविवाह, बालकांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे विचारात घेऊन हॉप फॉर चिल्ड्रेन या संस्थेकडून काम करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करण्यात येत असल्याचे अडोर यांनी नमूद केले.

pune

करोनाच्या संसर्गामुळे बालस्नेही पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यास काहीसा विलंब झाला. बालकांबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. सामान्यांना विश्वास देण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नमूद केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी प्रास्ताविक केले. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आभारप्रदर्शन केले.

राज्यासह देशात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. पुणे पोलिसांनी सुरू केलेले बालस्नेही पोलीस ठाणे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. गंभीर गुन्ह््यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन व बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. बालकांच्या तक्रारींच्या निराकरणाचे काम या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाईल. राज्यातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे.