Pune : शहरातील CCTV यंत्रणेचे सर्वेक्षण व्हावे : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कायदा सुव्यवस्था राखणे आणि तपास कामात अधिक प्रभावी ठरण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ यांच्याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता झाले, त्यांच्या तपासासाठी मॉडेल कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव दिसून येतो.. या प्रकरणातून धडा घ्यावा आणि पुणे महापालिकेने बसविलेले सीसीटीव्ही किती? पोलीस खात्याने बसविलेले सीसीटीव्ही किती? कोणत्या खाजगी संस्थांना या यंत्रणांचे काम दिले आहे? या यंत्रणा व्यवस्थित कार्यन्वित आहेत की नाही? सीसीटीव्ही गरजेप्रमाणे बसविण्यात आले आहेत का? या सगळ्याचे सर्वेक्षण व्हावे असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

शहरातील कायदा, सुव्यवस्था स्थिती चांगली रहावी. रस्त्यात चालणारी गुन्हेगारी, चोऱ्या-माऱ्या, विनयभंग आदी प्रकार उघड व्हावेत. त्यांना आळा बसावा अशा हेतूने ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. परंतु, त्याचा उपयोगच होणार नसेल तर या यंत्रणेचा उपयोग काय? असा प्रश्न मनात येतो याकरिता सर्वेक्षण होणे गरजेचे आहे आणि त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा केल्या जाव्यात, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.