Pune : ठेकेदार आधी ठरवायचा मग टेंडर काढायचं ! भाजपचा नवा पायंडा बंद करावा; मनपा विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळांची अजित पवारांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असताना लस खरेदीसाठी राज्य सरकारकडे बोट दाखवणाऱ्या सत्ताधारी भाजपचे पितळ उघडे पडले आहे. मुंबई महानगरपालिकेने लसींचे टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करुन लस खरेदी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी माहपालिकेकडे केली आहे.

तसेच दिपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले असून, यामध्ये त्यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून 5 ते 7 वर्षांचे टेंडर कालावधी घेण्याचा अट्टाहास केला जात आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पुणे महानगरपालिकेत पडला आहे. हा पायंडा बंद करावा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. सत्ताधारी भाजप पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून टेंडर प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

दिपाली धुमाळ यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले…
1.
निविदा क्र.14/2021 पुणे महानगरपालिका अंतर्गत ड्रेनेज लाईन साफसफाई 4 नग 12 केएल क्षमतेचे सक्शन कम जेटिंग रिसायकलर मशिनच्या सहायाने सात वर्षाच्या कालावधी करिता करणे हे टेंडर मागविण्यात आले असून एकाच वेळी सात वर्षाचा कालावधीसाठी निविदा मागविली आहे.

महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन मधील गाळ काढायचे काम वर्षोनुवर्षे होत असून यावर्षी 7 वर्षाच्या कालावधीसाठी 34 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते, असा नवीन पायंडा पुणे महानगरपालिकेत पडला आहे.

2. सुरक्षा विभागाने 30 कोटी रकमेचे टेंडर काढले असून यातून सुरक्षा रक्षक पुरविणे हे काम होणार आहे. या टेंडरच्या अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. अद्याप मनपा मिळकती कधी उघडणार याची शाश्वती नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.

3. महापालिकेस उत्पन्न मिळावे या हेतूने रस्ते खोदाईस परवानगी द्यायची आणि परवानगीचे ठिकाण सोडून शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर केबल्स टाकायच्या असा प्रकार चालू आहे.

4. पुणे शहरातील नदीतील जलपर्णी काढणेबाबत टेंडर प्रक्रिया राबविली असून हे काम विशिष्ट ठेकेदारास मिळावे या हेतूनेच बनविले आहे.

5. पुणे महानगरपालिकेचे 30 वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर काढले असून हा प्रकार म्हणजे ठेकेदाराठीच काम करायचे भाजपने ठरवले आहे असे म्हंटले तरी वावगे होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना मागील एक वर्षांपासून वाहनतळ सुरळीत चालू नसताना असे टेंडर काढले. पूर्वी एक एक वाहनतळाचे टेंडर काढले जायचे, अचानक हा बदल का केला यावर कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही, हे काम भाजपशी जवळीक असलेला ठेकेदारच घेईल यात शंका नाही.

अशा विविध टेंडरच्या माध्यमातून पुणेकरांच्या कररूपी पैशाची धुळदान उडविली जात असून कोरोनाच्या काळात गोंधळ घालू, नंतर आपली सत्ता नाही, आपण कशासही उत्तरदायित्व नाही, अश्या भावनेने पुणे महानगरपालिकेत गैरव्यवहार चालू आहेत. याचा फायदा प्रशासनातील काही अधिकारी उचलत असून काही अधिकारी खाजगीत बोलत आहेत.

मार्च 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे. कोरोनावर होणारा खर्च पाहता महापालिकेकडून वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. असे असताना महापालिकेचे लूट थांबणे सोडाच पुढील अनेक वर्षांमध्ये मनपा तिजोरीत कसा खडखडाट होईल याचे नियोजन लॉकडाऊन काळात चालू आहे. त्यामुळे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता हे सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना करावेत, अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.