Pune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तो रिक्षाचालक आहे.
जयदीप रामछबिले ठाकूर (वय २७, रा. धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
जानेवारी महिन्यात निलेश अराळकर हे पाठीवर सॅक घेऊन चालले होते.

दगडुशेठ ते शनिवारवाडा जात असताना अज्ञात चोरट्यांने त्यांच्या सॅकच्या कप्याची चैन उघडून ओपो कंपनीचा मोबाईल फोन चोरुन नेला होता. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट एकचे पथक करत होते. तांत्रिक विश्लेषण केले असता हा मोबाईल धानोरी येथील जयदिप ठाकुर नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहिती मिळविली.

शोध घेत असताना पोलिस कर्मचारी अमोल पवार व मल्लिकार्जुन स्वागी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ठाकुर हा विश्रांतवाडी ते लोहगाव मार्गावर रिक्षा चालवित असून तो नेपाळी आहे. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे ओपो कंपनीचा मोबाईल सापडला.
वरिष्ठ निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, अमोल पवार, वैभव स्वामी, इम्रान शेख, बाबा चव्हाण यांनी ही कामगिरी केली.