Pune : ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चा जिल्हा समन्वयक असल्याचे भासवून कोटयावधींची फसवणूक करणार्‍यास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचा जिल्हा समन्वयक असल्याचे भासवून गुंतवणुकीच्या असंख्य योजना सांगत नागरिकांची कोट्यंवधी रूपयांची फसवणूक करणार्‍यास गुन्हे शाखेने अटक केली. ही संस्था श्री श्री रविशंकर यांची आहे.

प्रणय उदय खरे (रा. मोनार्च गार्डन सोसायटी, साळुंखे विहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनीकुमार कांबळे (44, रा. औंध) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगचे मुख्यालय बेंगलोर येथील उदयपूर येथे आहे. या संस्थेच्या देशभरात शाखा आहेत. या संस्था नागरिकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्व त्यांना पटवून देण्याचे महत्वाचे काम करते. त्यांच्या पुण्यात देखील शाखा आहेत. याचाच फायदा प्रणय याने घेतला. आपण या संस्थेचा जिल्हा समन्वयक असल्याचा बनाव केला. तर ऑर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जे. के. व्हेंचर्स कंपनीत मोफत कार्यशाळा आयोजीत करत होता. ही कंपनी ऑर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेशी संबंधित असल्याबाबत नागरिकांना माहिती देवून तो आर्थिक गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना सांगत. याद्वारे तो नागरिकांचा विश्वास संपादन करून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत होता. दाखल गुन्ह्यानुसार, त्याने जे. के. व्हेंचर्स नावाची बोगस कंपनी स्थापन करून कंपनी मार्फत रत्नागिरी येथील खेड मध्ये सात हजार एक जागा घेत आहे असे तो सांगत. या जागेमध्ये 15 वर्षाकरिता 1 एकर जागेसाठी गुंतवणुक केल्यास पहिल्या अकरा गुंतवणुकदारांना एक कोटी रूपये, त्यानंतरच्या 50 गुंतवणुकदारांना 50 लाख रूपये तर त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणुकदारांना 40 लाख रूपये सहा वर्षानी टप्याटप्याने दिले जातील असे आमिष दाखविले. तसेच शॉर्ट टर्म योजनेत व मोरींगा झाडे लावण्याच्या योजनेत पैसे गुंतविल्यास भरपूर नफा मिळेल असे भासवून एकूण 1 कोटी 45 हजार रूपयांची फिर्यादींची फसवणूक केली. कंपनीच्या योजनेमध्ये कांबळे यांनी पैसे गुंतविल्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल, उपनिरीक्षक दिपक माने, शशिकांत शिंदे, गिता पाटील, कर्मचारी शंकर पाटील, गणेश साळुंखे, राजस शेख, सुरेंद्र साबळे, सचिन ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.