दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पतीकडून शिक्षक पत्नीस बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अनेक दिवसानंतर दारूचे दुकान उघडल्यानंतर रांगा लागल्याचे पाहिला मिळत असतानाच कर्वेनगर येथे एका शिक्षिकेने दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे पतीने तिला मारहाण केल्याची घटना घडली. रागाच्या भरात हातावर फरशी फेकून मारली. यात पत्नी जखमी झाली आहे.

याप्रकरणी हिंगणे होम कॉलनी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती अक्षय चंद्रकांत पवार (वय ३१) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षिका आहेत. तर, आरोपी हा काहीही कामधंदा करत नाही. आरोपीने पत्नीकडे मंगळवारी सायंकाळी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण, त्यांनी दारू पिण्यास पैसे दिले नाही. पैसे न दिल्याचा राग पती अक्षयला आला. त्याने हाच राग मनात धरला. दरम्यान त्यांच्या घराचे काम सुरू आहे. त्यासाठी काही स्टाईलच्या फरशा आणून ठेवल्या आहेत. त्यातील फरशी महिलेला फेकून मारली. ती फरशी महिलेच्या हातावर लागल्यामुळे जखम झाली आहे. त्यानंतर त्याांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत