तरुणाला दुचाकीची सर्व्हिसिंग पडली महागात…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे वापरत नागरिकांना गंडे घालत असून, एका तरुणाला दुचाकी सर्व्हिसिंगसाठी ऑनलाइन सर्च करणे महागात पडले आहे. त्याच्या आणि वडिलांच्या बँक खात्यावरून चोरट्यांनी 12 हजार रुपये चोरले आहेत.

याप्रकरणी आशय भुजबळ (वय १९, रा. घोरपडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशय यांना दुचाकी सर्व्हिसिंग करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करुन एका क्रमांकावर फोन केला. त्यानुसार संबंधिताने दुचाकी सर्व्हिसिंग करुन देतो असे सांगितले. त्यानंतर मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरल्यानंतर आशय यांना ती परत लिंक पाठविण्यास सांगितली. यावेळी आशय आणि त्याच्या वडिलांच्या बँकेची देखील माहिती भरण्यास सांगण्यात आले होते. ही लिंक पाठवताच त्याच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या १२ हजार रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशय यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अधिक तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.