पुण्यातील नर्‍हे आणि वारज्यात दुचाकी पेटवल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरालगत पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. सिंहगड रोड आणि वारजे माळवाडी परिसरात या घटना घडल्या आहेत. तत्पुर्वी वाहनांची तोडफोड अन् जाळपोळ ही दहशतीसाठी केली जाते. परंतु, यावर लगाम घालण्यात पोलिसांना यश आलेले नसून, हे प्रकार सुरूच असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी सिद्धार्थ कुटे (वय 18, रा. नर्‍हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तर, आकांक्षा डावरे (वय 23, रा. वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे नर्‍हे परिसरात राहण्यास आहेत. त्यांनी घराच्या शेजारी रस्त्यावर दुचाकी पार्किंग केली होती. सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या दुचाकीस आग लावली. यात दुचाकी जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, दुसरी घटना वारजेतील सिद्धार्थनगरमध्ये घडली आहे. आकांक्षा यांनीही रस्त्यावर दुचाकी पार्क केली होती. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला आग लावून 30 हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी सिंहगड आणि वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.