Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात गुरुवारी 4 जणांचा मृत्यू, विभागातील ‘कोरोना’बधितांची संख्या 1031 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिसंक्रमित केलेल्या भागात कडक निर्बंध लादल्यानंतरही शहरातील नवीन कोरोना बाधितांची संख्या दरदिवशी नवा उच्चांक गाठत चालली आहे. पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १०४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८७६ झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९८५ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासात पुण्यात चार जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यु झाला आहे. हे पाहता शुक्रवारी पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजारांचा टप्पा पार करेल, असे दिसून येत आहे. दरम्यान, पुणे विभागातील बधितांची संख्या 1031 वर जाऊन पोहचली आहे.

त्याचबरोबर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ३६ जण गंभीर स्थितीत आहेत. त्यातील २३ रुग्ण ससून हॉस्पिटलमध्ये असून त्यामधील ९ जणांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ससून रुग्णालयातील इतर १४ जणांना व्हेटिलेटरची गरज नसली तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पाच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ६० टक्के रुग्ण
शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोरोना बाधितांची संख्येने शंभरी पार केली आहे. त्यात प्रामुख्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक १८७, कसबा पेठ ११४, ढोले पाटील रोड १२२आणि येरवडा १०१ या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आहे. पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांपैकी ६० टक्के रुग्ण हे या पाच क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या भागातील आहेत. तसेच गेल्या काही दिवसात अन्य ठिकाणांपेक्षा या भागातूनच नवीन कोरोना बाधितांची संख्या अधिक आढळून येत आहे.