‘कोरोना’ची दशहत ! शहरात एकही गुन्हा दाखल नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गुन्हेगारांची दशहत असणाऱ्या शांतता प्रिय शहरात आज कोरोना विषाणूने दरारा निर्माण केला असून, याच दशहत सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर गुन्हेगार देखील असल्याचे आता खरे ठरत आहे. कारण, मंगळवारी शहरात एकही गुन्हा दाखल नसल्याचे समोर आले आहे.

जगभरात कोरोना आजाराने दशहत माजवली आहे. राज्य शासनाने जमावबंदीनंतर 31 मार्च पर्यंत  संचारबंदी केली. त्यात मंगळवारी केंद्र सरकारने 14 एप्रिल म्हणजेच 21 दिवस देश लॉकडाऊन केले आहे.

यामुळे सध्या देशात कोरोना आजाराने सर्वांनाच घरी बसावे लागले आहे. सर्वांच्या मनात दरारा निर्माण करणाऱ्या या कोरोना आजाराने गुन्हेगारांच्या मनात देखील चांगलीच दशहत निर्माण केली असल्याचे दिसत आहे. पोलिसांना न जुमानता बेधडक गुन्हेगारी करणाऱ्या या गुन्हेगारांची देखील चिडीचूप झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात 3 ते 4 गुन्हे दाखल होत होते. मात्र, मंगळवारी शहरात एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गुन्हेगारही शांत घरात बसून आहेत, असेच म्हणावे लागत आहे.

अवैध धंदे सुरू असल्याचे कॉल

शहरात गुन्हेगारीत घट झाली. एकही गुन्हा दाखल झाला नसताना मात्र मंगळवारी दिवसभरात पोलिसांना विविध भागातून अवैध धंदे सुरू असल्याचे कॉल प्राप्त झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काहीच नसल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी धंदे सुरू देखील होते.

गुन्हेगार नाही नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम

शहरात नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना गुन्हेगारांपासून भयमुक्त वातावरण देऊन मुक्त संचार करण्यासाठी रात्र-दिवस काम करणारे पोलीस आज मात्र नागरिक बाहेर पडणार नाहीत, यावर लक्ष ठेवत आहेत. दुसरीकडे मात्र, सण, उत्सव, रॅली, शहर बंद, दंगल किंवा तत्सम घटना घडल्यानंतर पोलीस रस्त्यावर उभा राहुन सुरक्षा करतात. आजही या महामारीत सर्वांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहेत.