पुण्यातील पुलगेट परिसरात खाद्यपदार्थाच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर रस्त्यावरील एका खाद्यपदार्थाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झालेली नसून, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविली आहे.

सोलापूर रस्त्यावरील पुलगेट परिसरात 8 नंबर जुना बंगला आहे. याठिकाणी परिमल जैन यांचे खाद्यपदार्थांचे गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये सोन पापडी, चिवडा तसेच हग्गीज यासारखे वस्तूंची साठवणूक केली जात असे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धुर येत असल्याचे निदर्शन आले. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर कॉन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे आणखी अग्निशमनच्या फायर गाड्या बोलविण्यात आल्या. मध्यवर्ती विभाग तसेच इतर अशा एकूण 5 फायर बंब जवानांसह दाखल झाले. परंतु, पॅकेट्स असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.

अग्निशमनच्या जवानांनी पाण्याचा माराकरून अथक प्रयत्नानंतर एक ते दिड तासांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. जवळपास 15 लाखांचे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. याठिकाणी नेमके रात्रपाळीला कामगार होते की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.