अखेर सदाभाऊंची समजूत काढण्यात भाजपला यश; पुणे पदवीधर निवडणुकीतील डोकेदुखी दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुका होत असून, येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपकडून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली होती. परंतु भाजपला मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात यश (pune-graduate-constituency-bjp-success-reaching-understanding-sadabhau-khot) आले आहे.

याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले की, भाजपचे घटक पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत आहोत, आम्ही समाधानी आहोत, निश्चित यापुढेही भाजपसोबत चांगले काम करू, पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होईल असे काम रयत क्रांती संघटना करणार नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे उमेदवार प्रा. एन. डी चौगुले यांनी पुण्यातून अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रयत क्रांती संघटनेचा योग्य तो सन्मान राखला जाईल, दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने विचार वेगळे असतात. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांविरोधात लढायची आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार मागे घेण्याचा प्रश्न नव्हता. घरात भांडणे होत असतात म्हणून नाराज व्हायचे नसतात, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची समजूत काढली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते. पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरुण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.

औरंगाबादमध्ये पदवीधर उमेदवारीवरून भाजपत नाराजी
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात भाजपला यश मिळाले असले तरी, औरंगाबाद पदवीधर उमेदवारीवरून भाजपात नाराजी वाढली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.