Pune : पुलाखाली आश्रयाला आले अन् आजी आणि नातू वाहून गेले, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) खेड (Khed) तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस (rain) झाला. यावेळी बाहेर असलेल्या आजी आणि नातवानं या पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका छोट्या पुलाचा (bridge) आश्रय घेतला आणि घात झाला. या पुलाखाली असलेल्या मोरीमधून जोरदार पाण्याचा प्रवाह आल्याने आश्रयाला थांबलेले आजी आणि नातू दोघंही वाहून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही चासकमान धरणात वाहून गेले असून कहू कोयाळी रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा आज (शुक्रवार) सकाळी मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

चासकमान धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसानं झोडपून काढले. यावेळी चासकमान जलाशय परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असताना कहू कोयाळी इथून ओढ्याच्या नाल्यातून वृद्ध महिलेसह 4 वर्षांचा चिमुकला पाण्यात वाहून गेला.

आदिवासी भागात राहणाऱ्या भोराबाई पारधी या आपल्या नातवासह शेतात काम करत होत्या. त्याचवेळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने त्यांनी पुलाखाली आश्रय घेतला. मात्र मुसळधार पावसाचे पाणी वाढलं आणि पुलाखाली पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामध्ये आजी आणि नातू वाहून गेले. तहसीलदार सुचित्रा आमले, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन टिम सोबत गुरुवारी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु असताना आज सकाळी नातवाचा मृतदेह सापडला.