खुशखबर ! आगामी १० दिवसात मुंबई, पुण्यासह राज्यात ‘दमदार’ पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र १० ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडणार आहे. पुढील १० दिवसांमध्ये धुव्वाधार पाऊस पडण्याचे कारण म्हणजे मोसमी वार्‍यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असणार्‍या मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी ५ ते १० ऑगस्टदरम्यान जोरदार पाऊस पडणार असून या भागांमधील पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळाच्या झळांपासून दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. या भागांमध्ये आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत तोकडा पाऊस पडला होता.

यामुळे आहे मोसमी वार्‍यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल :

मंगळवारी पूर्व मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यावर स्थिर असणारे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या राज्याच्या जवळ पोहोचले आहे. तसेच मागील आठवड्यात उत्तर भारतात असणारा मान्सूनचा उच्चतम पट्टा गेल्या दोन दिवसांपासून मध्य भारतात असून त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागातील पावसाचा जोर वाढल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने राज्यभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार आहे.

महाराष्ट्राच्या दक्षिण – नैऋत्य भागात अतिवृष्टीचा इशारा :

राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून त्याबाबतीत सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे मात्र पुढील ३ दिवसात येथील पर्वतीय भागात अतिवृष्टी शकते असे सांगण्यात आले.

गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा, विदर्भात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १० % कमी पाऊस पडला असून बळीराजा चिंतेत आहे. कोकणात आणि सरासरीपेक्षा मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे १३ % आणि ६ % अधिक तर मराठवाड्यात ३४ % कमी आणि विदर्भात ४१ % कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात चिंतेचे वातावरण होते परंतु आता याठिकाणी दिलासा मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त