Pune : भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाची मुहुर्तमेढ ! वर्गखोल्या बांधण्याची निविदा स्थायी समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाच्या कामाचा प्रत्यक्ष ‘श्रीगणेशा’ होत आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर हे महाविद्यालय उभारण्यात येणार असले तरी मंगळवार पेठेतील कै.बाबुराव सणस कन्याशाळेमध्ये या महाविद्यालयाच्या काही वर्गखोल्या असणार आहेत. या वर्गखोल्या तयार करण्याच्या कामाच्या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवातही होणार आहे.

महापालिकेची आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या २० एकर जागेवर वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्याची दहा वर्षांपुर्वीची संकल्पना आहे. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही संकल्पना अंदाजपत्रकात मांडली होती. भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पहिले स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रकामध्ये भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने या महाविद्यालयाची संकल्पना फक्त मांडलीच नाही तर त्यासाठी पाठपुरावाही केला आहे. नुकतेच राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया सुरू असताना डॉ. नायडू हॉस्पीटल सोबतच वर्गखोल्यांसाठी येथून जवळच असलेली महापालिकेची मंगळवार पेठेतील कै. बाबूराव सणस कन्याशाळा तसेच कमला नेहरू रुग्णालयातील जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रामुख्याने कन्याशाळेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या असतील. या शाळेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने आवश्यक नवीन वर्गखोल्या बांधण्याच्या तसेच जुन्या वर्गखोल्या दुरूस्तीच्या कामाची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. नवीन वर्गखोल्या बांधणे आणि जुन्या वर्गखोल्या दुरूस्तींसाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आली असून कमी दराने आलेल्या सुमारे १ कोटी २३ लाख रुपयांच्या कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. एकप्रकारे महाविद्यालयाच्या कामाची मुहुर्तमेढ यानिमित्ताने रोवली जाणार आहे.

यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्गखोल्या बांधणे व दुरूस्तीच्या निविदा आजच्या बैठकीमध्ये दाखल करून घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे आजची बैठक तहकुब करून गुरूवारी घेण्यात आली आहे. गुरूवारी होणार्‍या बैठकीमध्ये या निविदांना मान्यता देण्यात येईल.