Pune : हडपसर परिसरात तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. दरम्यान खून झालेला तरुण कोणत्याही टोळीचा सदस्य नसून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी स्पष्ट केले आहे.

अनिकेत घायतडक (वय 28, रा. मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संशयित शुभम व त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान यातील संशयित शुभम व त्याचे एकमेकांकडे खुन्नसने पाहणे यावरून सतत वाद होत होते. शुक्रवारी मध्यरात्री काही कारणावरून त्यांचे वाद झाले. यानंतर चार ते पाच जणांच्या टोळक्याने मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून त्याचा खून केला. काही वेळाने हा प्रकार हडपसर पोलिसांना समजला. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकांनी संशयित शुभमला ताब्यात घेतले आहे.

अनिकेत याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. त्याची इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यात टोळीचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.