पुणे : मनपामध्येही पक्षांतर केलेले नगरसेवक म्हणतात – ‘हीच ती वेळ’ ! पदांसाठी BJP मध्ये ‘स्पर्धा’ अन् ‘दबाव’ वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपीएमएल संचालक बदलण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमधील इच्छुक सरसावले आहेत. पहिल्या तीन वर्षात महत्वाच्या पदांपासून वंचित राहीलेल्या आणि अन्य पक्षातून भाजपमध्ये येऊन नगरसेवक झालेल्या सदस्यांनी यासाठी कंबर कसली असून हीच ती वेळ अशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे हे नुकतेच झालेल्या निवडणुकीत आमदारपदी निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत ९९ नगरसेवक संख्या असलेल्या नगरसेवकांनाही महापालिकेतील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी भाजपने या दोन्ही आमदारांचे नगरसेवक पद कायम ठेवून त्यांच्याकडे असलेल्या पदांचे राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. तर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही जवळपास पावणेतीन वर्षे पदाचा कारभार सांभाळला असल्याने त्यांच्या ऐवजी नवीन सदस्याला संधी देण्यासाठी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष असे की भाजपचे ९९ नगरसेवक निवडून आलेे असले तरी त्यामध्ये पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची संख्याही भली मोठी आहे. मूळचे भाजपचे आणि अनुभवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या संख्या तशीही कमी आहे. त्यामुळे पक्षामध्ये विविध पदांवर काम केलेल्या आणि पक्षाशी नाळ घट्ट असलेल्यांनाच आतापर्यंत प्रमुख पदांवर नियुक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. महापौर आणि उपमहापौर पदी मुक्ता टिळक आणि नुकतेच उपमहापौर झालेल्या सरस्वती शेंडगे सोडल्या तर अन्य ज्येष्ठ महिला नगरसेविकांना संधी मिळालेली नाही. तसेच अन्य पक्षात दोन- तीन टर्म निवडूण आलेले आणि भाजपवासी झालेेले पाच ते सहा नगरसेवक आहेत. परंतू समिती सदस्यपदांव्यतिरिक्त त्यांना फारशी संधी देण्यात आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर बदललेल्या राजकिय गणितांमुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या विरोधी पक्षांचे मनोबल निश्‍चितच वाढलेले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांकडून निश्‍चितच जोर लावला जाणार आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर्गत समतोल आणि समन्वय राखणारा तसेच फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये विरोधकांनाही सोबत घेणार्‍या सदस्याकडेच सभागृहनेते पदाची सूत्रे दिली जातील अशी शक्यता आहे. सभागृह नेतेपदासाठी महेश लडकत, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चवथ्यांदा नगरसेविका झालेल्या वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे अभ्यासू सदस्यांचीही नावे चर्चीली जात आहेत. तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांच्या रुपाने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यालाही संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. परंतू फारच अदलाबदल होण्याची शक्यता असल्यास हेमंत रासने यांचा सभागृहनेतेपदी विचार होवू शकतो, अशी शक्यता भाजप वर्तुळातून वर्तविली जात आहे. तर पीएमपीएमएलच्या संचालकपदी प्रवीण चोरबोले, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, दिपक पोटे, सुशिल मेंगडे, अनिल टिंगरे यांच्या नावाचा विचार केला जावू शकतो, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.

‘हीच ती वेळ’
पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये खासदार संजय काकडे यांना माननार्‍या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. हे सर्वजण भाजपचे नगरसेवक असले तरी त्यांना तीन वर्षात कुठलेही पद मिळालेले नाही. सातत्याने डावलले जात असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्ष एकसंघ राहावा याकरिता या मंडळींना सत्तेत सामावून न घेतल्यास ऐन निवडणुकीच्या तोंडावर या असंतोषाचा भडका होवू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सदस्यांनीही हीच ती वेळचा नारा देण्यास सुरूवात केली असून दबावाचे राजकारण सुरू केल्याचे चर्चेतून जाणवत आहे.

Visit : Policenama.com