Coronavirus : पुणेकरांसाठी सप्टेंबर महिना ठरला ‘घातक’, धक्कादायक आकडेवारी आली समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घालते आहे. एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे कोरोनाच्या परिस्थितीशी महाराष्ट्र लढा देत आहे. राज्यात मुंबई नंतर पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. पुण्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एका इंग्रजी दैनीकाने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिना हा पुणेकरांसाठी सर्वात घातक महिना ठरला आहे. जिल्हा आरोग्य कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, 1 ऑक्टोबरपर्यंत कोविडशी संबंधीत मृत्यूची संख्या 31.4 टक्के नोंदवण्यात आली आहे. 7335 रुग्णांपैकी 2306 जणांचा एकाच महिन्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात ऑगस्ट महिन्यामध्ये 29.7 टक्के म्हणजे 2177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्हा आरोग्य कार्यालयाने केलेल्या विश्लेषणामध्ये असेही दिसून आले आहे की, 61-70 वयोगटातील लोकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी ही 30 टक्के आहे. त्यानंतर 22 टक्के हा 51-60 वयोगटातील लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 1.20 लाख नवीन रुग्ण आढळून आले. मार्च महिन्यात पहिल्यांदा नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येनंतर सप्टेंबर महिन्यांत हा आकडा सर्वात जास्त होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक होती. त्यामुळे येणाऱ्या सण-उत्सवाच्या काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, सप्टेंबर महिन्यात ही संख्या सर्वाधिक होती. कारण, आपल्याकडे नवीन रुग्णांच्या केसेसमध्ये मृत्यूची घट दिसून आली आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असे म्हटले जात आहे. तशी शक्यता नाकारताही येत नाही. मात्र, आपण ही लाट रोखू शकतो. लोकांनी जर सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर न करणे, योग्य खबरदारी घेतली नाही तर दुसरी लाट येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. असे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुके यांनी म्हटले आहे.