नायडू हॉस्पिटलमध्ये अचानक गेली वीज आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा जीव आला धोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. हॉस्पिटलमधील जनरेटर नादुरुस्त आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाला. 11 वाजून 36 मिनिटांनी महावितरणचा वीज पुरवठा बंद झाला. आता वीज गेल्यामुळे जनरेटर चालू होणे अपेक्षित होते. मात्र, जनरेटर चालू झाले नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये काळोख पसरला होता.

सुदैवाची बाब म्हणजे, 10 मिनिटांनी वीज पुरवठा आपोआप पूर्ववत झाला म्हणून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे जीव वाचले. व्हेंटिलेटरच्या असलेल्या बॅटरी उतरल्या होत्या. अंदाजे 20 ते 25 रुग्ण व्हेंटिलेटरवर हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. जनरेटरची देखभाल दुरुस्ती करणारे कोणीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. जर महावितरणचा वीज पुरवठा वेळेवर सुरू झाला नसता तर पुढील मोठी जीवितहानी झाली असती. नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहे. दरम्यान, बीडमधील शासकीय कोरोना कक्षात असाच प्रकार घडला होता. यामुळे आरोग्य प्रशासनाचा आणि रुग्णालय विभागाचा भोंगळा कारभार समोर आला आहे. अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आणि जनरेटर नसल्यामुळे रुग्णांचे हाल झाले होते.