संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील व शहरांतर्गत रस्ते बंद, मार्केटयार्डमधील भुसारबाजार 24 मार्च तर भाजीपाला बाजार 25 मार्चपासून बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील ‘जनता कर्फ्यू’ ला उत्तम प्रतिसाद देणार्‍या नागरिकांनी रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुन्हा गर्दी करायला सुरूवात केल्याने शेवटचा उपाय म्हणून राज्य शासनाने संपुर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यापुढे जाउन राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून एस.टी., रेल्वे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानसेवाही बंद केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी याची घोषणा केल्यानंतर सातारा रस्ता, तळेगाव, लोणीकाळभोर या टोलनाक्यावरच रस्ते सील केले असून शहरातही प्रमुख रस्ते बॅरिकेडींग करून बंद केले आहेत. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून नागरिकांनी पुढील काही दिवस घरामध्येच राहून सहकार्य करावे, असे आवाहन राज्य शासनापासून अगदी स्थानीक प्रशासनातील अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.

जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी संपुर्ण देशात नागरिकांनी बंद पाळत घरातच राहाणे पसंत केले. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी पाच वाजता नागरिकांनी कोरोना विरोधात लढा देणारे डॉक्टर्स व सर्व यंत्रणेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळया, थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. परंतू अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करून अगदी विजयी जल्लोषाप्रमाणे गर्दी करत थाळ्यांसोबतच, वाद्य आणि ङ्गटाके वाजविल्याने जनता कर्फ्यूच्या मूळ उद्देशाला हरताळ ङ्गासला गेला. याचीच परिणीती म्हणून आज सकाळी अनेक ठिकाणी नागरिक आपल्या दैनंदीन कामांसाठी बाहेर पडल्याचे दिसले. जवळपास सर्वच शहरात सकाळपासून खाजगी वाहने मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आली.

दुसरीकडे एका रात्रीत मुंबईत १४ आणि पुण्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर व मुंबईत दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासन अधिकच आक्रमक झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सर्व खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फन्सींगद्वारे संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर फेसबुक द्वारे संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू केली. तत्पुर्वीच पुणे पोलिसांनी जमावबंदीच्या माध्यमातून आज दिवसभर शहर पिंजून काढताना विनाकारण गाड्या घेउन सैरसपाटा मारणार्‍यांना काठीचा प्रसाद देत गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. दुपारपासूनच शहरातील महत्वाच्या रस्ते बॅरिकेड उभारून बंद ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवा यातून वगळली असली तरी किराणा माल, भाजीपाल्यांची दुकाने तसेच मेडीकल्सवर मात्र नागरिकांनी गर्दी केली होती.

मार्केटयार्डमधील भाजीपाला व फळबाजार २५ मार्चपासून बंद तर भुसार बाजार २४ मार्चपासून बंद

कोरोना व्हायरसचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. व त्याला रोखण्यासाठी गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे, भाजीपाला, व कांदा – बटाटा बाजार मंगळवार दिनांक २४ मार्च २०२० रोजी संपूर्णपणे चालू राहील. त्यानंतर बुधवार दिनांक २५ मार्च २०२० ते मंगळवार दिनांक ३१ मार्च पर्यंत फळे भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आज आडते असोसिएशनच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आहे. याची सर्व शेतकरी, आडते, व्यापारी, कामगार, व टेम्पो चालक या सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी ही विनंती, अशी विनंती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी केली आहे. तर संचारबंदीमुळे वाहनांवर बंदी आल्याने कर्मचारी वर्ग उपलब्ध राहाणार नाही तसेच मालाची वाहतूक करणेही शक्य होणार नसल्याने २४ मार्चपासून भुसार बाजारही बंद राहाणार असल्याचे दि. पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी कळविले आहे.