Pune : जम्बो कोविड सेंटरमध्ये आत्मीयतेने करण्यात येत आहे रूग्णसेवा, सेंटरमधील रूग्णांनी व्यक्त केलं समाधान ! (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाशी लढा देत असताना रूग्णांना केवळ औषधोपचार नाही तर त्यांच्यामध्ये जगण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टर, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अगदी निस्वार्थ भावनेने ही दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून आपले कर्तव्य पूर्ण करीत आहेत. असाच काहीसा सुखद अनुभव पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांचा आहे. येथे रूग्णांवर वेळच्यावेळी औषधोपचार करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य सेंटरमधील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी अगदी आत्मीयतेने करीत आहेत. याबद्दल येथील रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले व्यावसायिक सचिन रमेश घोडके यांनी व्हिडीओद्वारे आपला अनुभव व्यक्त केला आहे. ते सांगतात की, सुरूवातीला येथे दाखल होण्यापूर्वी मनात खुप किंतू, परंतू होते पण येथे रूग्णांची ज्यापध्दतीने सेवा केली जात आहे ते पाहून मी भारावून गेलो. येथील डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी अगदी मनापासून आपले कर्तव्य करीत आहेत. रूग्णांची आपल्या कुटुंबियांप्रमाणे काळजी घेत आहेत. रूग्णांना देण्यात येणार्‍या अन्नाचा दर्जा देखील उत्तम आहे. येथील यंत्रणा सर्वोत्तम आहे. येथे मिळत असलेल्या सेवेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

असाच अनुभव इतर रूग्णांचा देखील आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर हे आता केवळ कोविडवर उपचार करणारे सेंटर न राहता येथील रूग्णांचे दूसरे घरच झाले आहे. असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

सेंटरविषयी थोडेसे –

मागील काही आठवड्यांमध्ये जम्बो कोविड रुग्णालयात टप्प्याटप्प्याने रुग्णांसाठी बेड तयार करण्यात येत आहेत. जम्बोमधील कार्यान्वित करण्यात आलेल्या एकूण बेड संख्येने आता 600चा टप्पा पार केला आहे. येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.

आता सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालयात एकूण 600 बैडपैकी 500 बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. उर्वरित 100 बेडपैकी 70 आयसीयू बेड आहेत, तर 30 व्हेंटिलेटर बेड आहेत, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत केली होती. त्याचप्रमाणे महापौर मुरलीधर मोहोळ हे जम्बोची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्या अनुषंगाने येथील यंत्रणा राबविण्यात येत आहे. जम्बो कोविड रुग्णालयात व्यवस्थापन बदलण्यात आल्यावर पुन्हा नव्याने सुरुवातीला शंभर बेड, नंतर दोनशे बेड कार्यान्वित करण्यात आले. मागील दोन आठवड्यापर्यंत चारशे बेड, तर आतापर्यंत एकूण सहाशे बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत.