FC रोडवरील गोदामात चोरीचा प्रयत्न, 3 महिलांना डेक्कन पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्दी असणाऱ्या एफसी रोडवरील इमारतीच्या गोदामातील साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शांती प्लाझा, व्हिनस लेनमध्ये ही घटना घडली.

आशा संतोष जगताप, पौर्णिमा वैदूनाथ जाधव आणि नजमा मजहर जमादार (सर्व रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी देवानंद सावळे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद हे एफसी रस्त्यावर असलेल्या शांती प्लाझामध्ये सुरक्षारक्षक आहे. बुधवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास तीन चोरट्या महिलांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोदामाचे कुलूप तोडून आशा, पौर्णिमा आणि नजमा ए.सी, पाण्याची टाकी, मोटार, फ्रीज चोरी करताना दिसून आल्या. त्यामुळे देवानंद यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन तिन्ही महिलांना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक बी. डी. मेटे अधिक तपास करीत आहेत.