दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्थीमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, काडतूस, दोन तलवारी, दोन कोयते, मिरची पावडर, दोरी असा ऐवज जप्त केला आहे.

प्रतीक पृथ्वीराज कांबळे (वय 27), उमेश राजेश चव्हाण (वय 19), केतन संजय चव्हाण (वय 21), संकेत आनंद तारु (वय 18), रुपेश राजेंद्र गायकवाड (वय 23 सर्व रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास श्रीकृष्ण चौकातील नागझरी नाल्याजवळ त्यांना पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी फरासखाना पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण चौकाजवळील नागझरी नाल्यात पाच ते सात जणांचे टोळके संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक, उमेश, केतन, संकेत, रूपेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, कोयते, तलवारी, मिरची पावडर मिळून आले. अधिक चौकशीत त्यांनी मंगळवार पेठेनजीक असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा घालणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर अधिक तपास करीत आहेत.