प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक DSK यांच्या भावाला विमानतळावरून अटक, अमेरिकेत पळून जाण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणूकदारांची कोटयावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासुन अटकेत असलेल्या पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई येथील विमानतळावरून अटक करण्यात आली. ते अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डीएसके दाम्पत्याला देखील पुणे पोलिसांनी दिल्ली येथुन अटक केली होती. त्याला अनेक महिने झाले आहेत. तब्बल २५०० हून अधिक गुंतवणुकदारांची २३० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोपी डीएसके आणि त्यांच्या भावावर आहे. डीएसकेंच्या कंपनीत मकरंद कुलकर्णी हे डायरेक्टर म्हणून आहेत. पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिस अनेक दिवसांपासुन मकरंद कुलकर्णी यांचा शोध घेत होते. ते मिळून येत नसल्याने त्यांच्याविरूध्द लुकआऊट नोटीस देखील काढण्यात आली होती.

अखेर मकरंद कुलकर्णी यांना विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.