Pune : अवैधरित्या गुटख्याची विक्री, हडपसरमधील व्यापार्‍याला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या हडपसरमधील एका व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ८४ हजारांचा आरएमडी, विमल, तुलसी व्हिवन गुटखा जप्त करण्यात आला. बिंजाराम उर्फ विजय गणेश देवासी (वय २४ रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात सर्व तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस कडेकोट बंदी होती. पण लॉकडाऊन शिथिल होतास बंदी असणारा गुटखा तेजीत सुरू झाला आहे. दरम्यान गुन्हे शाखेला त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हडपसर भागात काळेपडळ येथील विमलाई इमारतीत व्यापारी घरातून अवैधरित्या गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, बिंजाराम गुटख्याची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला गुरुवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, बंडू शिंदे, सतिश वणवे यांच्या पथकाने केली.