Pune : हडपसरमध्ये पावसाची दमदार ‘हजेरी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल दोन दिवसांपासून कडक उन्हामुळे घामाघूम झालेल्या उपनगरांसह लगतच्या गावातील नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. दुपारी साडेचारच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह वरुण राजाने हजेरी लावली. पावसामुळे सर्वत्र वातावरण शांत झाले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विेकेंडमुळे (शनिवार-रविवार) सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी नव्हती, वाहनांची वर्दळ थंडावली होती.

संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना सुखावणारे आणि जलसाठ्यांना तृप्त करणारे नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानच्या परिसरात शुक्रवारी दाखल झाले. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुढील ४८ तासांमध्ये ते आणखी प्रगती करणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले.

अलीकडच्या दीर्घकालीन अंदाजानुसार मोसमी वारे अंदमानात दाखल होण्याची नियोजित तारीख २२ मे गृहीत धरण्यात आली आहे. यंदा ते एक दिवस आधीच तेथे दाखल झाले आहेत. सध्या अंदमानमध्ये मोसमी पावसाच्या ढगांची निर्मिती होऊन काही भागात पाऊस सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात देशात सरासरीप्रमाणेच ९८ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात कधी?
केरळात मोसमी वारे पोहोचण्याची नियोजित तारीख १ जून असली, तरी यंदा ते ३१ मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ ते ८ दिवसांत ते तळकोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात.