Pune Serum Institute : शरद पवार यांच्याकडून सीरमच्या ‘त्या’ इमारतीची पाहणी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती सुरु असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. त्यात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे. नऊ कामगारांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशामक दलाल यश आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत परिस्थिती जाणून घेतली. शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीरमला भेट दिली.

शरद पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. वारजे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर ते सीरम मध्ये दाखल झाले. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी घटनेबद्दल पवार यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी पवार यांनी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. तेव्हा विठ्ठल मणियार, आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याण विधाते आदी उपस्थित होते.

आगीची घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मांजरी बुद्रुकच्या (गोपाळपट्टी) बाजूकडे असलेल्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या सहा मजली इमारतीच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या ठिकाणी काही कामगार दैनंदिन काम करत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीचा घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यावर याबाबत बोलता येईल. आताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असे मत व्यक्त केले.

एक हजार कोटींचे नुकसान ?
“आगीच्या इमारतीत तीन-चार मजल्यांवरचे साहित्य जळाले आहे, त्यात जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जगात अन्य देशांना पुरवल्या जाणाऱ्या रोटा आणि बीसीजी लशींच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे,” सीरमचे सीईओ आदर पुनावाला म्हणाले.