Pune : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेच्या रूग्णालयात गोंधळ, पोलिसांकडून तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात येत केस पेपर न काढता औषध का देत नाही असे म्हणत गोंधळ घालून कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निलेश दशरथ गिरमे (वय 35, रा. धायरी), लोकेश रवी राठोड (वय 21) व हेमंत काळूराम भगत (वय 48, रा. धायरी गाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात कल्पेश घोलप (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश गिरमे हे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत. तर फिर्यादी हे वडगाव बुद्रुक येथील पालिकेच्या स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालयात औषध निर्माता म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी निलेश गिरमे व त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात आले. त्यांनी केस पेवर न काढताच फिर्यादी यांना औषध का देत नाही म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच येथे गोंधळ घालत कर्मचारी व फिर्यादी यांना दमदाटी करत धकाबुक्की करत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी सिहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक ए. के. बोदडे या करत आहेत.