लोणी काळभोर : नामांकित शिक्षण संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थीनीने केली आत्महत्या

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमके आत्महतेचे कारण समजलेलं नसून पोलिस तपास करीत आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, येथील एम. आय. टी. शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी वीस वर्षीय विद्यार्थीनीने अज्ञात कारणासाठी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या शिक्षण संस्थेत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींची हजेरी घेत असताना वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांना काही मुली अनुपस्थित असल्याचे लक्षात आले. यावर त्यांनी एक शिपायास विद्यार्थीनींना बोलावण्यास पाठविले. परंतु एका खोलीतील विद्यार्थीनी दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यानी स्वामी यांना सांगितले. यावर सुरक्षा रक्षक अधिकारी यांना याची कल्पना दिली. त्यावर दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला असता आत एका ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन ती विद्यार्थीनी छताच्या पंख्याला लटकलेली होती. यावर ताबडतोब लोणी काळभोर पोलिसांना खबर दिली. पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचाऱ्यांना पाठवले व त्या विद्यार्थ्यांनीला विश्वराज हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले परंतु ती मृत असल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलिस पुढील तपास करीत आहेत. परंतु येथे हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.