यामुळेच केले होते ‘त्या’ विधी अधिकाऱ्याला बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बडतर्फ असतानाही आपण अजूनही विधी अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या चंद्रकांत कांबळे यांना त्यांच्या अशाच संशयास्पद व्यवहार व वागणूकीमुळे बडतर्फ केले होते, हे समोर आले आहे. याशिवाय त्यांना पुन्हा कधीही विधी अधिकारी म्हणून नेमणूक करु नये, असा अहवाल पुणे ग्रामीण पोलिसांनी गेल्याच महिन्यात पाठविला होता.
मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बडतर्फ विधी अधिकारी चंद्रकांत कांबळे व त्याचा साथीदार शशिकांत जयप्रकाश राव यांना मंगळवारी सापळा रचून पकडले.
न्यायालयात खटला चालविताना तो अधिक बळकट असावा व त्यात कायद्याच्या दृष्टीने त्रुटी राहू नये, यासाठी सल्ला देण्यासाठी तसेच पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारी व गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार कशाप्रकारे कारवाई करावी, यासाठी वकिलांची विधी अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते. क्लिस्ट गुन्ह्यांमध्ये ते कायदेशीर सल्ला पोलिसांना देतात. त्यानुसार चंद्रकांत कांबळे यांची विधी अधिकारी म्हणून ग्रामीण पोलीस दलात मुख्यालयात नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांचे एकंदर वागणे आणि व्यवहार संशयास्पद होता. त्यांच्याविषयी तक्रारी असल्याने पोलिसांनी चौकशी केली. त्यात तथ्य जाणवल्याने ग्रामीण पोलिसांनी त्यांना गेल्या वर्षी मे २०१८ मध्ये बडतर्फ केले होते. अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी त्याची चौकशी करुन त्यांना पुन्हा पुणे ग्रामीण पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून नेमणूक करु नये, असा अहवाल गेल्याच महिन्यात विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविला होता. काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईतून ग्रामीण पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगून कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

चंद्रकांत कांबळे याने अजून आपण त्याच पदावर असल्याचे तक्रारदाराला भासविले. त्यांंच्या मालकाच्या विरुद्ध मोका कायद्यान्वये प्राप्त प्रस्तावावर तक्रारदारांच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी केली. कांबळे यांनी शशिकांत राव याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयासमोरील चौपाटीवर तक्रारदारांकडून १० लाख रुपये स्वीकारताना राव याला पकडण्यात आले. त्यापाठोपाठ कांबळे यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.