पुण्यात मंदिरात फक्त दर्शनाची सोय ! हार, फुले, प्रसाद न आणण्याचे आवाहन, मस्जिदे नमाज पठाण साठी खुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने सोमवारपासून मंदिर, मस्जिद , चर्च उघडण्यास परवानगी देण्यात आली असून तिचे सर्वांनी स्वागत केले आहे. पाडव्या पासून शहरातील सर्व मंदिरे उघडण्यात येणार असून सुरुवातीचे काही दिवस भाविकांना फक्त दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. हार, फुले स्वीकारण्यात येणार नाही. तसेच प्रसाद देण्यात येणार नाही. मस्जिद व चर्चमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

श्रींमत दगडुशेठ हलवाई मंदिरात पाडव्या पासून फक्त दर्शनाची सोय करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. गोडसे म्हणाले की, इतके महिने नियमांचे पालन केले. त्याप्रमाणे शासनाने मंदिर खुले करण्यास परवानगी दिली तरी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी हार, फुले, नारळ आणू नये काही दिवस प्रसाद देण्यात येणार नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर असल्याने पाडवा व सणाच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. कमीतकमी वेळेत भाविकांना दर्शन कसे मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून भाविकांनीही सर्व काळजी घेऊन दर्शनासाठी यावे, असे आवाहन गोडसे यांनी केले.

सारसबागेतील तळ्यातील गणपती मंदिरात पाडव्यापासून भाविकांना फक्त दर्शनाची सोय उपलब्ध असणार असल्याची माहिती देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी दिली. पाडव्याला गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. आम्ही केवळ भाविकांना दर्शनाची सोय करुन देणार आहोत. प्रसाद, तिर्थ देण्यात येणार नाही. तसेच भाविकांनी हार, नारळ, प्रसाद घेऊन येऊ नये. भाविकांनी सकाळी एकाच वेळी गर्दी करु नये. कोथरुड येथील मृत्युजंय मंदिरातही भाविकांनी बेल, फुले घेऊन येऊ नयेत.

मस्जिदींमध्ये प्रत्येक नमाजानंतर सॅनिटायझिंग करणे
रोशन मस्जिदचे इमाम आणि सदर सिरत कमिटीचे प्रमुख मौलाना गुलाम अहमद खान कुरेशी यांनी सांगितले की, गेली ८ महिने मस्जिद कोरोनामुळे बंद होत्या. शासनाने आज मस्जिद खुले करण्याची घोषणा करण्याबरोबरच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. मस्जिदमध्ये एकावेळी जेवढ्या भाविकांना प्रवेश देण्याचे बंधन घातले असेल. त्याचे पूर्णपणे पालन केले जाईल.

जमियते उलेमा पुण्याचे प्रमुख मौलाना कारि ईद्रस यांनी सांगितले की , शहरातील मस्जिदीमध्ये प्रत्येक अजाननंतर येथील इमाम कोरोनाच्या काळात कशी काळजी घ्यावी सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याबाबत आवाहन केले जाईल. मस्जिदबाहेर सॅनिटायझर बसविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना घरातून येतानाच वझु ,हात,पाय धुवून व सॅनिटायझरचा वापर करुन येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.