Pune : ‘पीएमपी’च्या दरवाढीसह ‘ते’ प्रस्ताव पुढे ढकलले, संचलनातील तूट टप्प्याटप्प्याने देण्यात येईल : हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पीएमपी प्रशासनाने ई बसेसच्या दरवाढीसोबतच प्रवासी संख्या वाढी संदर्भात संचालक मंडळापुढे ठेवलेले प्रस्ताव तूर्तास ‘प्रलंबित’ ठेवण्यात आले आहेत. पीएमपीएमएलचा तोटा कमी होउन प्रवासी संख्या कशी वाढेल? याचे सादरीकरण संचालक मंडळापुढे ठेवा, अशी सूचना करतानाच संचलनातील तूट किती आहे? ती टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असे आश्‍वासनही पीएमपीएमएल प्रशासनाला दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पीएमपी संचालक मंडळाची आज बैठक झाली. प्रशासनाने या बैठकीमध्ये ई बसेसचे प्रत्येक टप्प्यावर ५ रुपये दरवाढ करण्यासोबतच, शहरामध्ये ४० रुपयांत पीएमपीने दिवसभर प्रवास, लॉंगरुटवरील बसेसचे थांबे कमी करून जलद बससेवा, तसेच विनाथांबा बससेवा सुरू करण्याचे प्रस्ताव बैठकीपुढे ठेवले होते. या प्रस्तावावर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाली. परंतू यामुळे पीएमपीची प्रवासी संख्या वाढण्यास कशी मदत होईल, उत्पन्न वाढून तूट कशी कमी होईल याबाबत प्रशासनाने सविस्तर सादरीकरण करावे, असे या बैठकीमध्ये एकमताने ठरवून तूर्तास हे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. तर सध्याच्या स्थितीत ई बसेस चालविल्याच जात नसल्याने सध्या भाडेवाढीचा विचार करण्याची गरजच नसल्याने दरवाढीचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आल्याचे पीएमपीचे संचालक नगरसेवक शंकर पवार यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाउनमुळे अगोदरच तोट्यात असलेल्या पीएमपीची आर्थिक अवस्था नाजूक झाली आहे. पीएमपीची आर्थिक तूट किती आहे? याचा तपशील प्रशासनाने महापालिकेला द्यावा. त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिका आपल्या हिश्याची रक्कम देईल, असे आश्‍वासनही महापालिकेच्यावतीने प्रशासनाला दिल्याचे हेमंत रासने यांनी नमूद केले. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पीएमपीचे संचालक नगरसेवक शंकर पवार, पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप या बैठकीला उपस्थित होते.