Pune : येरवडा परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   येरवडा परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा १३० किलो गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान येरवडा परिसर गांजाचे केंद्र बनत असल्याचे दिसत असून, यापूर्वी येथून गांजा तस्कारांना पकडण्यात आले आहे. पण तरीही येथे गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसत आहे.

अरुण बळीराम जाधव (वय २६, रा. निगडी), प्रशांत हरिभाउ शिंदे (वय २५, रा. काळभोर गोठा, निगडी), व शुभम सुनील मोहिते (वय १९, रा. पांगोरी, खेड, पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैध प्रकारांना आळा घालण्यात येत आहे. तर अमली पदार्थांची उलाढाल देखील होत आहे. पोलीस कारवाई करत आहेत, पण त्यानंतरही अमली पदार्थ विक्री कमी होत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात गोल्फकडे एका कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती कर्मचारी प्रमोद गाडे यांना मिळाली. त्यानुसार डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर चौकात सापळा रचण्यात आला. त्यावेळी तेथे आलेल्या संशयित मोटारचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने मोटार न थांबविता जोरात दामटली.

त्यामुळे खंडणीव अमली पदार्थ विरोधी पथकाने फिल्मी स्टाईल मोटारीचा पाठलाग करुन अरुण, प्रशांत आणि शुभमला ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीत पाच गोण्यांमध्ये तब्बल १३० किलो गांजा आढळून आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, प्रदीप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनील चिखले, विजय गुरव, महेश कदम, साहिल शेख, मनोज शिंदे, फिरोज बागवान, प्रमोद टिळेकर, प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, रुपाली कर्णवर, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.