Lockdown 3.0 : मांजरी खुर्दमध्ये कडकडित लॉकडाऊन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हवेली तालुक्यातील २१ भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ( कन्टेन्मेंट झोन ) म्हणून जाहीर केले आहेत. मांजरी खुर्द गावामध्ये या आदेशाची अंमलबजावणी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून सुरु केली आहे. कडकडित लॉकडाऊन पाळले जात आहे. हवेली तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हवेली उपविभागीय कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीपासूनच गावात प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत आहे. सोमवारपासून कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर ग्रामस्थही सतर्क राहिले आहेत. शेतातील कामाव्यतिरिक्त ग्रामस्थ घराबाहेर पडत असून, इतर व्यवहार ठप्प आहेत. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल. त्यासाठी नागरिकांनी घरामध्ये राहून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थ अशोक आव्हाळे यांन केले आहे.