कोंढव्यात दोन गटात राडा, 9 वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुर्ववैमन्यश्यातून दोन गटात झालेल्या भांडणात एका गटातील टोळक्याने 9 वाहनांची तोडफोड केल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. यात 8 दुचाकी व एका कारचे नुकसान झाले आहे.

सोहेल नवाज शेख (वय 19), सोहेल इस्माईल शेख (वय 18) आणि फरहान नियाज मनियार (वय 19 तिघेही रा. आश्रफनगर, कोंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, दोघा अल्पवयीनांना पकडले आहे. याप्रकरणी साबिया शेख (वय 40, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल, शेख, फरहान आणि त्यांचे इतर साथीदार कोंढव्यातील आश्रफनगरमधील गल्ली क्रमांक पाचमध्ये राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांची दुसर्‍या गल्लीतील मुलांशी वाद झाला होता. त्यामुळे त्या गल्लीतील टोळके मारामारी करणार असल्याचा संशय सोहेल, शेख, फरहानला होता. त्यामुळे बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी दुसर्‍या गल्लीतील टोळक्याला मारहाण करण्याचा कट रचला.

मात्र, त्यांना ही खबर लागल्याने टोळके पळून गेले. त्याचा राग आल्यामुळे सोहेल, शेख, फरहान यांच्यासह इतर चार साथीदारांनी मिळून परिसरातील 8 दुचाकींची तोडफोड केली. एका मोटारीची काच फोडून 10 हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. के. पवार अधिक तपास करीत आहेत.

You might also like