पुण्यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या; दोघांचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जुना कात्रज बोगद्याच्या उतारावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले.

प्रविण नारायण पवार (वय ३०, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता) आणि किशोर विष्णू पांचाळ (वय १८, रा. लाचणे चाळ, कात्रज) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर, रोहित पांडुरंग साळुंखे (वय १८, रा. अजनीनगर, कात्रज) आणि छबुबाई नारायण पवार (वय ५५, रा. जाधव चाळ, दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक नितीन तळपाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रविण पवार व किशोर पांचाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर व रोहित हे शनिवारी रात्री सातच्या सुमारास जुन्या कात्रज बोगद्याकडून कात्रजकडे येत होते. तर, प्रविण व त्याची आई कात्रजकडून भोरला जाण्यासाठी जुन्या कात्रज बोगद्याकडे निघाले होते. जुना कात्रज बोगद्याजवळी उतारावर स्वागत हॉटेल समोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकी एकमेकांमध्ये घुसल्या होत्या.

या दोन्ही दुचाकीचे चालक असलेले प्रविण व किशोर यांचा मृत्यू झाला. तर, पाठीमागे बसलेले दोघे जखमी आहेत. छबुबाई यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस एम. एस. देशमुख हे तपास करत आहेत.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कोंढवा खुर्द परिसरातील इनामदार हॉस्पिटल समोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आदिल रफिक शेख (वय ४३, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्या व्यकतीचे नाव आहे. याप्रकरणी फरार झालेल्या अज्ञात कार चालकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.