Pune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात पतीच्या त्रासाला कंटाळून व त्यातून आलेल्या नैराश्यातून एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मनिषा रमेश कदम (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती रमेश नारायण कदम याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा या स्त्रीरोग तज्ञ होत्या. त्यांचे पती रमेश हे देखील डॉक्टर आहेत. सातारा जिल्ह्यातील मेंढ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. रमेश नेहमी मनीषा यांना दारूच्या नशेत मारहाण करत. चारित्र्याच्या संशयावरून त्यांना शिवीगाळही करत असे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनीषा यांना माहेरी नेऊन सोडले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा परत आणले नाही. याबाबत त्यांची सासरच्या मंडळीसोबत एक बैठकही झाली होती. यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीसोबत राहत होती लहान मुलगी मनीषा यांच्यासोबत राहत होती. पतीसोबतच्या भांडणामुळे त्यांना मोठ्या मुलीला भेटताही येत नव्हते. त्यामुळे मनीषा नैराश्यात होत्या. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मनीषा यांनी २७ नोव्हेंबर घरात भुलीच्या लसीचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक एस एस कथले या करीत आहेत.

You might also like