Pune : आंबील ओढा सिमाभिंतीचे काम तातडीने करा, ओढे-नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेच्या आपत्कालिन निधीतून आंबील ओढा येथे तातडीने सिमाभिंत बांधावी आणि ओढे-नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून केली.

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्याला महापूर आला होता. त्यावेळी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सिमाभिंत बांधण्याचे आश्‍वासन महापालिकेने दिले होते. मात्र सातत्याने पाठपुरावा करुनही प्रशासनाने सिमाभिंतीचे काम केलेले नाही.’

आमदार मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘स्टेट बँक कॉलनी, अप्पर इंदिरानगर, गुरुराज सोसायटी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉल्नी, अरण्यश्‍वर परिसरातील सोसायट्या, मित्र मंडळ चौक, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आल्यास आजही भीतीचे सावट आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे तातडीने सिमाभिंत बांधण्यात काम पूर्ण करावे.’

आंबील ओढा परिसरात ओढ्यालगत आणि नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह वळविला आहे. मलनिसारण वाहिन्या आणि पावसाळी गटारे बुजविली आहेत. त्यामुळे पूर येण्याच्या दुर्घटना वारंवार होतात. अशा सर्व अतिक‘मणांवर तातडीने कारवाई करावी. मनपा सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या प्रायमो संस्थेच्या अहवालात दर्शविलेले ओढेनाले आणि त्यांची सद्यस्थिती यांचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा अशी मागणीही आमदार मिसाळ यांनी केली आहे