Pune : विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. भरधाव डंपरचालकाने सिग्नल न देता वळणावर वळण घेतल्याने दुचाकी धडकून हा अपघात झाला आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

निरजा संजय जानराव ( वय २४, रा. केसनंद फाटा, वाघोली ) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. विकास भिकू गुजर (वय २७, रा. भेकराईनगर) या चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी शुभम खेमकर (वय २४, रा. भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व निरजा सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बुलेटवरुन हडपसरकडे चालले होते. त्यावेळी काळूबाई मंदीर चौकात डंपरचालकाने सिग्नल न देता अचानकपणे वळण घेतले. त्यामुळे शुभमच्या बुलेटचा हँडल डंपरच्या सेफ्टी गार्डमध्ये अडकला आणि तो खाली कोसळला. यात निरजा डंपरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुभमला हाताला जखम झाली आहे. अधिक तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

दुचाकी स्लिप होऊन अल्पवयीन मुलाचा मृत्यू
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात ८ सप्टेंबरला धायरी येथील गणेशनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक अर्चना बोदडे यांनी सिहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलाने हेल्मेट घातले नव्हते. तो दुचाकी घेऊन वेगात उंबऱ्यामारुती चौकाकडून धायरीकडे जात असताना गणेशनगर येथे त्याची दुचाकी स्लिप झाली. त्यात दुचाकीचे हँडल त्याच्या डोक्याला लागले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास सिहगड रोड पोलीस करत आहेत.