विवाहीत असताना देखील तिनं पुन्हा लग्न केलं, साखर पुडा ठरलेला असताना तरूणानं केली आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – प्रेमात पडल्यावर त्यांनी घरातील लोकांना न सांगता परस्पर रजिस्टर मॅरेज केले. त्याचा फायदा घेऊन तिने या तरुणाचा मानसिक छळ सुरु केला. या त्रासाला कंटाळून २८ वर्षाच्या तरुणाने साखरपुडा ठरलेला असताना आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत झाल्याप्रकरणी तरुणाच्या पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी या तरुणाच्या काकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये २८ जून २०२० रोजी सायंकाळी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण हा बांधकाम व्यावसायाशी संबंधित असून त्याचे कुटुंब सुखवस्तू आहे. हा तरुण आणि एक तरुणी यांच्यात ५ वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांनी २०१६ मध्ये गुपचूप रजिस्टर लग्न केले होते. मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना न सांगता ते दोघेही आपापल्या घरी राहत होते. अधून मधून ते बाहेर भेटत होते. बाहेर भेटत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले. या तरुणीचा अगोदरच विवाह झाल्याचा दावा फिर्यादी यांनी केला आहे. तिने या तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. आता ती त्याला तक्रार करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर ते ही या तरुणाला मानसिक त्रास देऊ लागले.

इकडे तरुणाच्या घरच्यांना याची काहीही कल्पना नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरविले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणू लागली. जर पळून आला नाही तर सर्व उघड करण्याची धमकी ती देऊ लागली. त्याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गच्चीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पोलिसनामला सांगितले की, या आत्महत्येचा तपास करीत असताना या तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी तिचे ५ -६ फोन या तरुणाला आलेले निष्पन्न झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.