पुण्यातील आणखी 2 पोलिस कर्मचार्‍यांना ‘सक्‍तीने सेवानिवृत्‍ती’ची शिक्षा ; ‘सक्‍तीने सेवानिवृत्‍ती’मुळे संपुर्ण पोलिस दलात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणार्‍या तसेच पोलिस दलास अशोभनिय कृत्य करणार्‍या आणि वेळोवेळी शिस्तभंग करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून अतिशय कडक कारवाई करण्यात येत आहे. दोनच दिवसांपुर्वी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचार्‍याला सक्‍तीने सेवानिवृत्‍तीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर आता चंदननगर आणि कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांना सक्‍तीने सेवानिवृत्‍तीची शिक्षा देण्यात आली आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दत्‍तात्रेय केरू कोहक (पोलिस शिपाई-चंदननगर पोलिस स्टेशन, बक्‍कल नंबर 2136) आणि वैभव चंद्रकांत बनकर (पोलिस शिपाई-कोंढवा पोलिस स्टेशन, बक्‍कल नंबर 8377) अशी शिक्षा देण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी कोहक आणि बनकर यांच्याविरूध्द अनुक्रमे खडकी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दत्‍तात्रेय कोहक हे खडकी सहाय्यक आयुक्‍तांकडे क्राईम कारकुन म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी त्यांना परिसरात अवैध गुटखा विक्री चालु असल्याची माहिती होती. तरी देखील त्यांनी त्याबाबत वरिष्ठांना त्याची कल्पना दिली नाही. त्यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले. याबरोबरच त्यांनी इतर अनेक बाबींमध्ये हलगर्जीपणा केला. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आता सक्‍तीने सेवानिवृत्‍तीची कारवाई करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस आयुक्‍त सुनिल फुलारी यांनी पोलिस कर्मचारी दत्‍तात्रेय कोहक आणि वैभव बनकर यांना शिक्षा देण्याचा आदेश दिला आहे. बनकर हे कोंढवा पोलिस ठाण्यात उंड्री बीट मार्शल म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरूध्द दि. 5 मे 2018 रोजी लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीदरम्यान बनकर हे दोषी आढळल्याने त्यांना देखील सक्‍तीने सेवानिवृत्‍तीची शिक्षा देण्याचा आदेश देण्यात आला आहे. सक्‍तीने सेवानिवृत्‍तीचा आता सर्वांनीच धसका घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.