भारतीय चाहत्यांना धक्का ! ‘या’ दोन सुपरस्टार्सची WWE मधून सुट्टी, ‘पंजाबी रेसलर’चा देखील समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. डब्ल्यूडब्ल्यूईने दोन सुपरस्टार्सना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये भारतीय वंशाचा पंजाबी रेसलर व दुसरा त्याचा साथीदार आहे. टॅग टीम चँपियन असलेले दोन्ही रेसलर यापुढे डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये दिसणार नाहीत. आपण बोलत आहोत ‘ऑथर्स ऑफ पेन’ बद्दल, ज्यांनी आपल्या रेसलिंगच्या शैलीने डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये धमाल माजविली. डब्ल्यूडब्ल्यूईने ‘ऑथर्स ऑफ पेन’ टीमचे दोन्ही स्टार्स अर्थात एकम आणि रेझार यांना कंपनीतून रिलीज केले आहे. एकम आणि रेझारबाबत डब्ल्यूडब्ल्यूईच्या या अचानक आलेल्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले.

एकम आणि रेझार एक उत्तम टीम म्हणून खेळत होते. दोघांनी मिळून अनेक टायटल त्यांच्या नावे केली. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एकम यांनी 2014 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये एन्ट्री केली होती. त्यांनी 2015 मध्ये एनएक्सटी (NXT) मध्ये येताच त्यांचा दबदबा निर्माण केला होता. रिंगमध्ये पंजाबी भाषेतील त्यांची गर्जना ऐकून भारतीय चाहते उत्साही व्हायचे. त्यांनी प्रवेश केल्यानंतर रेझारला आपला पार्टनर बनवलं आणि त्यानंतर एनएक्सटीमध्ये धमाल माजवत एनएक्सटी चॅम्पियनशिपचे टायटल आपल्या नावे केले.

डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये पाहता पाहताच या दोघांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. यानंतर रॉ मध्ये टॅग टीम म्हणून दोघांना प्रवेश मिळाला. येथे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून रॉ टॅग टीम स्पर्धाही जिंकली. पण त्यानंतर एकमच्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि यामुळे ते बर्‍याच दिवसांपासून डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगपासून दूर राहिले. अखेरच्या वेळी ते मार्च मध्ये दिसले होते. भारतीय वंशाचे पंजाबी रेसलर एकमचे खरे नाव सनी सिंह धींसा असे आहे. एकम उत्कृष्ट पंजाबी बोलतात. डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये त्यांना बर्‍याच वेळा पंजाबी बोलताना पाहण्यात आले आहे. एकमचे पार्टनर रेझार नेदरलँड्सच्या अल्बेनियाचे रहिवासी आहेत. त्याचे खरे नाव गिजीम सेलमानी आहे.

डब्ल्यूडब्ल्यूई पूर्वी रेझारने एमएमए (MMA) मध्येही उत्तम कामगिरी केली आहे. ते अवघ्या 15 वर्षांत 8 वेळा जिंकले आहेत आणि 2 वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, त्यानंतर त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये प्रवेश केला. परंतु डब्ल्यूडब्ल्यूईने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर आता ही जोडी रिंगमध्ये दिसणार नाही.