ललिता कड यांना गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील रहिवासी असलेल्या शिक्षिका ललिता अजित कड यांना स्वर्गीय राजीव साबळे यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त नुकताच गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

ललिता अजित कड या सन २००२ रोजी दौंड तालुक्यातील वडगाव बांडे सारख्या दुर्गम भागात पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांनी कामाची सुरूवात केली. दौंड तालुक्यात काम करत असताना सलग पाच ते सहा वर्ष जिल्हा पातळीपर्यंत खो-खो, लेझीम, कबड्डीचे संघ खेळविण्यात त्यांना यश आले. वडगाव बांडे शाळेतील एक विद्यार्थी आय ए एस अधिकारी झाला आहे. असेच काम राहू, कासुर्डी (दौंड) येथेही त्यांनी केले. २०१८ साली पुरंदर तालुक्यात कुंभारवळण शाळेवर त्या रुजू झाल्या. तेव्हापासून सलग दोन वर्ष जिल्हापातळीवर खो-खो, लांब उडी, उंच उडी, लेझिम इत्यादींमध्ये त्यांनी मुलांना यश प्राप्त करून दिले.

पुढील काळातही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे यश प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे ललिता कड यांनी सांगितले. लहान वयातच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती आहे.