केवळ ‘कल्पनारम्य’ धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही : प्रणव मुखर्जीं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी यांनी बोलताना हे विधान केले आहे. सध्या भारताचा विकासदर ७.४ असून पुढील वर्षी म्हणजे हा विकासदर (जीडीपी) ७. ८ टक्क्यांपर्यंत पोहचावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. देश गेल्या कित्येक वर्षांपासून गरिबीची लढाई लढतो आहे. ती हटवण्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे. आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मात्र देशातील केवळ १ टक्के लोकांकडे देशातील ६०% पैसा असून ही चिंताजनक बाब आहे.’

देशातील कार्पोरेट वर्गाने पुढे येऊन देशातील बेरोजगारी आणि गरिबी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. रोजगार निर्मित्ती, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या अर्थिक विकासाची धोरणं राबविली पाहिजेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.