‘कुत्ता गोळी’ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक खुलासा

नाशिक/मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शहरामध्ये कुत्ता गोळी विक्री करणारे 40 पेक्षा अधिक विक्रेते आहे. याठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुत्ता गोळी विक्रीला चाप लागला पाहिजे अशी मागणी केली आहे. या गोळीची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा युवा पिढी व्यसनाधीन होईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. या गोळीला सांकेतिक भाषेत बटन असे म्हटले जाते. गोळी पाऊच खिशात सहज बसत असल्याने याची विक्री करताना रंगेहाथ पकडणे अवघड आहे.

गोळ्याच कनेक्शन गुजरात
शहरात विक्री होत असलेल्या कुत्ता गोळी प्रकरणात गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. मागील आठवड्यात विशेष पोलीस पथकाने अटक केलेल्या वासीम शेख याची कसून चौकशी केली. या चौकशीत या गोळ्या व नेशेची औषध शहरात विक्रीसाठी सुरत येथून येत असल्याची माहिती मिळाली. आझाद नगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत सुरत येथील औषध विक्रेता मेहुलकुमार ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या औधांची वाहतूक करणाऱ्या आरिफ सैय्यद जावीद (रा. म्हाळदे शिवार) आणि चालक शेख अफजल जमील (रा. नुरबाग) यांना अटक केली. त्यांच्याकडून ट्रक (एमएच 41 जी 7776) जप्त केला आहे.

शहरात 40 पेक्षा अधिक विक्रेता
या गोळीची विक्री करणारे शहरामध्ये 40 पेक्षा अधिक विक्रेते आहेत. या गोळीची विक्री करण्यासाठी लहान मुलांचाही वापर होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. पोलिसांना खात्रीलायक टीप मिळाल्यानंतर कारवाई शक्य होते. शहर व परिसरातील कोणताही औषध विक्रेता यात नाही. यापूर्वी नगर, धुळे येथे कनेक्शन मिळाले होते. या शहरांपाठोपाठ आता गुजरात कनेक्शन समोर आले आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या वसीम शेख याच्याकडून तब्बल सव्वातीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये कुत्ता गोळीसह, गर्भपाताच्या गोळ्या, कोरेक्स औषधाचे बॉक्स जप्त करण्यात आले होते. शहरामध्ये नशेसाठी मोठ्या प्रमाणात अल्प्राझोलम या गोळीचा कुत्ता गोळी म्हणून सर्रास वापर होतो. नशेत गुन्हेगारी कृत करत असल्याने याचा छडा लावणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.

 

अपर अधिक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलीस शिपाई भुषण मोरे, भावसार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून सुरतचे धागेदोरे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.